मूर्तिजापूर: शहरातील शिवाजी महाराज नगरात एका कार्यक्रमासाठी मंडप टाकत असताना घरावरून गेलेल्या जिवंत विद्युत तारांचा डोक्याला स्पर्श झाल्याने युवक गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.शिवाजी महाराज नगरात राहणारे विनोद भटकर यांच्या घरी १५ फेब्रुवारी रोजी लग्न समारंभ आहे. या समारंभासाठी सोमवारी दुपारी मंडप व विद्युत रोषणाई टाकण्याचे काम सुरू होते. लोखंडी पाइपांचा मंडप घालत असताना, संदीप खडसे(२३ रा. सिंधी कॅम्प मूर्तिजापूर) याच्या डोक्याला विद्युत तारांचा अचानक स्पर्श झाला. यात संदीप गंभीररीत्या भाजला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. संदीप हा राजेश डेकोरेशन येथे मजूर म्हणून कामाला होता. युवकाच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)
मंडप टाकत असताना वीज तारांच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 18:32 IST