अकोट शहरामध्ये दीनदयाल योजनेमध्ये आजपर्यंत ३५० महिला बचत गट नोंदणीकृत असून यामधील शिलाईकाम करणाऱ्या ८४ सभासदांची यादी शासनाला पाठविण्यात आली होती. त्यानुसार अकोट नगर परिषदेला १५ हजार २०२ मास्क शिवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये प्रेरणा शहर तर संघ नगर परिषद अकोट यांच्या अंतर्गत महिला बचत गटांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते. यामध्ये शहरातील ८० महिलांनी सहभाग घेतला होता. ८० महिलांमधून २४ महिला या मास्कची शिलाई करण्याकरिता इच्छुक होत्या. याकरिता मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे व शहर अभियान व्यवस्थापक सुनीता तायडे यांनी सर्व महिलांना योग्य मार्गदर्शन करून दारिद्र्यरेषेखालील महिलांना या कोरोना महामारीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला. अकोट शहरातील महिलांनी शिलाईचे काम पूर्ण केले व हे मास्क विक्रीमधून महिलांना रोजगार उपलब्ध झाला. अकोट शहराची राज्याच्या ३६ जिल्ह्यांमधून लोकसंख्येच्या आधारावर व बचत गटातील सदस्यसंख्या याच्या आधारावर निवड झाली होती. यामध्ये १५ हजार २०२ मास्कचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी उत्कृष्ट सुती कापडाचा उपयोग करून ज्यामध्ये सूक्ष्म धूलिकण व पाण्याचे बिंदू आरपार जाणार नाहीत, असे शिलाईकाम करावे लागणार होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर या गटामधून चारदिवसीय प्रशिक्षण देऊन महिलांकडून उद्दिष्ट पूर्ण झाले असून, २८ महिला बचत गटाला रोजगार मिळाला आहे. या उपक्रमासाठी शासनाने अकोट शहरातील बचत गटातील शेकडो भगिनींना मोलाचा हातभार लावला आहे अशी माहिती समुदाय संघटक नीलेश देशमुख यांनी दिली आहे.
उपजीविका अभियानात महिला बचत गटांना मिळाला राेजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST