अकोला: बाभूळगाव जहाँगीर येथील देशी दारूचे व बीअरचे दुकान हटवून गावात दारूबंदी करण्यासाठी गावातील शेकडो महिलांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास २५ ते ३0 महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांना निवेदन देऊन त्यांना गावातील दारूचे दुकान हटविण्याची मागणी केली. महिलांनी दिलेल्या निवेदनामध्ये गावातील देशी दारू व बीअरच्या दुकानामुळे युवक व पुरुषांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. या दारू दुकानामुळे गावातील अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारूडे दारू पिऊन रस्त्यांवरून येणार्या-जाणार्या महिला, युवती व मुलींना अश्लील शिवीगाळ करतात. रस्त्यामध्ये उभे राहून अश्लील संवाद साधतात. दारूच्या दुकानासमोर अनेकदा वाद होऊन हाणामार्यासुद्धा होतात. यासंदर्भात ग्रामपंचायतकडे अनेकदा गावातील महिलांनी तक्रार करूनही ग्रामपंचायतने तक्रारीची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे, दारूचे दुकान दररोज सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडण्यात येते आणि रात्री १२ वाजताच्या सुमारास बंद होते. एवढेच नाहीतर ड्राय डेच्या दिवशी दुकान उघडून अवैधपणे दारू विक्री करण्यात येते. देशी दारूच्या दुकानामध्येच बीअरची विक्री होत असल्याने गावातील तरुण मुलेसुद्धा व्यसनी बनत आहेत. त्यामुळे दारूचे दुकान गावातून त्वरित हटवून गावात दारूबंदी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार
By admin | Updated: November 22, 2014 01:52 IST