पातूर : तालुक्यातील पिंपळखुटा येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने गावाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह गावातील महिलांनी पंचायत समितीत धडक देत गटविकास अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घातला. महिलांनी आक्रमक पवित्रा घेत बीडिओंना थांबवून एका खोलीत जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ बंदिस्त केले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत गटविकास अधिकाऱ्यांची सुटका केली.
तालुक्यातील पिंपळखुटा येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने गावातील विकासकामे थांबली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पालकमंत्री, मुख्याधिकारी जिल्हा परिषद अकोला, गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन ग्रामसेवक देण्याची मागणी केली होती. तसेच निवेदनातून उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार सरपंच अलका सुभाष वाहोकार, उपसरपंच काशीराम सुदाम वानखडे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा गणेश नागोलकार, रुक्मिणी श्रीकृष्ण सोळंके, मनोरमा ज्ञानेश्वर घोगरे, वैभव वानखडे लक्ष्मण इंगळे यांच्यासह महिलांनी पंचायत समितीच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले. प्रभारी गटविकास अधिकारी ओ. टी. गाठेकर हे प्रभार घेण्यासाठी पंचायत समितीत दाखल झाले असता महिलांनी ग्रामसेवक देण्याची मागणी करीत घेराव घातला व ग्रामसेवक देण्याची मागणी करीत आक्रमक झाल्या. त्यानंतर प्रभारी ग विकास अधिकारी गाठेकर हे प्रभार न घेताच पंचायत समितीच्या बाहेर गाडीत बसण्यासाठी निघाले असता महिलांनी गाडी अडवून उपसभापतींच्या कक्षात गटविकास अधिकाऱ्यांना बंदिस्त केले. जोपर्यंत ग्रामसेवक देणार नाही, तोपर्यंत बीडिओंना जागेवरून हलू देणार नाही, असा पवित्रा घेत महिलांनी गटविकास अधिकाऱ्यांना तब्बल दोन तासांपेक्षा जास्तवेळ थांबवून ठेवले. दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करताना शाब्दिक चकमकही झाली. माजी सभापती बालू बंगाडे, पंचायत समिती सदस्या अर्चना विष्णू डाबेराव, विष्णू डाबेराव यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी पोलीस ताफ्यासह पंचायत समितीत धाव घेतली. पोलिसांनी मध्यस्थी करीत गटविकास अधिकारी ओ. टी. गाठेकर यांची सुटका केली. त्यानंतरही महिलांनी जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका घेतल्याने रात्रीपर्यंत उपोषण सुरूच होते.
------------------------------------
230821\img_20210823_160111.jpg
महिला आक्रमक