अकोला: वर्हाडातील अभयारण्यांमध्ये रानडुक्कर, रोही व हरिण आदी वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी े सक्रीय असून, शुक्रवारी झालेल्या बिबट्याच्या शिकारीवरून हा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाने आरोपींना अटक केल्यानंतर यापूर्वीही त्यांनी कोल्ह्यासह अन्य प्राण्यांचीही शिकार केल्याची कबुली दिली. अकोला, वाशिम, बुलडाण्यासह अमरावती विभागातील शेतांमध्ये गत काही वर्षांपासून रानडुक्कर, रोही व हरिणांचा वावर वाढला आहे. ही जनावरे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असला तरी वन्य प्राण्यांची शिकार करणार्यांना फावत आहे. रानडुक्कर, हरिणाचे मांस तसेच कातडी व शिंगाचीही विक्री केली जाते. वेळप्रसंगी वाघ व बिबट्याचीही शिकार करण्यात येते. पातूर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या चोंढी बिटमधील जांब शिवारात एका नाल्यात ७ फेब्रुवारी रोजी बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात बिबट्याचा विजेच्या शॉकमुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून वनविभागाच्या कर्मचार्यांनी चौघांना अटक केली.त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी यापूर्वीही रानडुक्कर, रोही व कोल्ह्याची शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. जांब शिवारात बिबट्याची शिकार करणार्यांनी बिबट्याच्या कातड्याच्या तस्करीसाठी प्रयत्न चालविले होते. त्यातून ही टोळी पकडली गेली. अन्य अभयारण्यांमध्येही अशाप्रकरणे प्राण्यांची शिकार करण्यात येत असल्याची शक्यता असून, वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. यासंदर्भात , उप वनसंरक्षक - प्र. ज. लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली असल्याची माहिती दिली. रानडुकराच्या शिकारीसाठी सापळा लावला होता. त्यामध्ये बिबट्याचा अडकल्याने मृत्यू झाला. यापूर्वीही कोल्ह्यासह त्यांनी वन्य प्राण्यांची शिकार केली आहे. आरोपींकडून आणखी माहिती काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. *शिकार करण्याची पद्धत रानडुक्कर, हरिण किंवा रोही हमखास शेतात येत असल्याची खात्री असल्यामुळे शिकार्यांनी विद्युत तारेचा धक्का देवून शिकार करण्याची पद्धत अवलंबली आहे. शेतांमध्ये खुंट्या रोवून त्याला तार बांधण्यात येते. या तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात येतो. या तारांचा शॉक लागून प्राण्याचा मृत्यू होतो. यानंतर हे शिकारी त्या प्राण्याचे कातडे, हाडे, शिंगे व मांस विकतात.
वन्य प्राण्यांच्या शिकारीची टोळी सक्रीय
By admin | Updated: February 12, 2015 00:18 IST