अकोला:- विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अनंत चतुर्दशीनंतरच जाहीर होणार असल्याने राजकीय पक्षही त्यानंतरच उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे. अशातच कॉँगेस -राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुतीमध्ये जागा वाटपाचा ितढा अद्यापही सुटलेला नाही. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला अकोला जिल्ह्यातील केवळ मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ असतानाही पक्षाने जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्या. कॉँग्रेसनेही मूर्तिजापूर मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या. महायुतीमधील भाजपने यंदा जागा वाढवून देण्याची मागणी लावून धरली असून, यामध्ये शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अकोला पूर्व मतदारसंघावर काही पदाधिकार्यांनी दावा केला. त्यामुळे आघाडी आणि महायुतीमधील पक्षांच्या इच्छुकांची धडधड दिवसेंदिवस वाढतच असून, जागा वाटपाबाबत कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.
** इच्छुकांमध्ये रस्सीखेच अन घालमेलही
विधानसभेचा अकोला पूर्व मतदारसंघ आघाडीमध्ये कॉँग्रेस आणि महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे. मात्र सध्या दोन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये उमेदवारीवरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेमध्ये जवळपास ८ दिग्गजांनी उमेदवारीसाठी ह्यफिल्डिंगह्ण लावली आहे. इच्छुकांमध्ये एका महिला पदाधिकार्यांचाही समावेश आहे. उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी काही तर ह्यमातोश्रीह्णवरही जाऊन आले होते. इच्छुकांशी २ सप्टेंबर रोजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चाही केली. इच्छुकांची संख्या पाहून पक्षप्रमुख ठाकरे यांनी इच्छुकांनाच आपसात चर्चा करुन एकमताने एकचे नाव पुढे करण्याचा सल्ला दिला. अशा तच प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी पुढे आलेल्या एका नावाने मात्र सर्वांनाच अचंबित केले होते. त्यामुळे आता या इच्छुकांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु झाली आहे. नाव द्यायचे तर कुणाचे, असा प्रश्न प्रत्येकालाच भेडसावत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या एका दिग्गज इच्छुकाला वाशिम जिल्ह्यातील एखाद्या मतदारसंघातून लढविण्याची ऑफर दिली जाऊ शकते. अकोला पूर्व मतदारसंघात कॉँग्रेस इच्छुकांमध्येही रस्सीखेच सुरु आहे. या मतदारसंघातील ८ इच्छुकांचे अर्ज जिल्हा कॉँग्रेस कमिटीकडून प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. अशातच अकोला पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय मालोकार यांनीही कॉँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांची भेटही घेतली होती. त्यामुळे पक्षातील इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे. नेते सामाजिक समीकरणात दंग विधानसभेचा अकोला पश्चिम मतदारसंघ आघाडीत कॉँग्रेसच्या तर महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे.
मतदारसंघासाठी कॉँग्रेसच्या एकूण १८ इच्छुकांचे अर्ज प्रदेश कार्यालयात पाठविण्यात आले. त्यानुसार पक्षाने उमेदवारीसाठी चार इच्छुकांचे पॅनल तयार केले. या पॅनलमधील एकाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. पॅनलमध्ये अल्पसं ख्याक समाजाच्या एका उमेदवारासह एका महिलेचाही समावेश आहे. उर्वरित दोघे मुस्लिमेतर असून, हे दोघेही जण अल्पसंख्याक समाजाच्या मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात नेहमीच जात, धर्माच्या आधारे म तदान होते. २00९ च्या निवडणुकीत अल्पसंख्याक आणि कॉँग्रेसच्या पारंपरिक मतांचे झालेले विभाजन भाजपच्या पथ्यावर पडले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अल्पसं ख्याक मतांचे विभाजन टाळण्यासाठी मुस्लीम समाजास महापौर पद देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदवारीसाठी भाजपमध्येही रस्सीखेच सुरु असून, मनपाचे आजी-माजी पदाधिकारीही प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक इच्छुकाकडून धार्मिक अथवा इतरही प्रसंगी शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. काही इच्छुक तर ह्यगडकरीह्ण वाड्यावरही जाऊन आले. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही अकोला पश्चिम मतदारसंघावर दावा केला आहे.