अकोला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दुपारी अकोला येथे येऊन गेलेत. त्यांच्या या अघोषित दौर्यामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना अकोला येथील शिवणी विमानतळावर सोडून त्यांचे विमान नागपूरच्या दिशेने रवाना झाले, तर ना. खडसे हेसुद्धा बाळापूर मार्गे मुक्ताईनगरकडे निघून गेलेत. मुंबईतील कामे आटोपून मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी दुपारी विमानाने नागपूरला येणार होते. त्याचवेळी कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनाही त्यांच्या गावाला जाण्यासाठी निघायचे असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विमानातच अकोल्यापर्यंत येण्याचा निर्णय घेतला. अकोला येथून ना. खडसे यांना मुक्ताईनकरला जाणे सोयीचे होणार असल्याने त्यांनी या मार्गाचा वापर केला. मुख्यमंत्र्यांचे विमान शिवणी विमानतळावर येणार असल्याची माहिती दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोल्यात धडकली आणि प्रशासनाची धावपळ सुरू झाली. विमानतळावरील बंदोबस्त लावण्यात आला. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांच्या स्वागतासाठी अधिकारी धावपळ करीत विमानतळावर पोहोचले. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे विमान पोहोचले. त्यामधून ना. खडसे बाहेर पडले, पण मुख्यमंत्र्यांनी बाहेर येण्याचे टाळले. त्यामुळे विनातळावर पोहोचलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.मुख्यमंत्र्यांनी विमानात बसल्या बसल्याच निरोप घेतला आणि त्यांचे विमान नागपूरकडे रवाना झाले. त्यानंतर ना. खडसे खासगी वाहनाने बाळापूर मार्गे मुक्ताईनगरला रवाना झालेत. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे होते. गव्हाणकर बाळापूरपर्यंत त्यांच्या गाडीत गेले. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांच्या या खासगी दौर्याने प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक झाली.
मुख्यमंत्री अचानक अकोल्यात पोहोचतात तेव्हा.
By admin | Updated: January 7, 2015 01:30 IST