अकोला: बाश्रीटाकळी ग्रामस्थांनी मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व पुन्हा फोडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचे खडेबोल मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकाला शुक्रवारी सुनावले. यापुढे असा प्रकार होणार नसल्याची ग्वाही ग्रामसेवक व सदस्यांनी दिली. मनपा आयुक्तांच्या दालनात शुक्रवारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांसोबत आयुक्तांनी चर्चा केली.बाश्रीटाकळी गावानजिक महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वची तोडफोड केल्याने ९ फेब्रुवारीपासून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मनपा प्रशासनाने गावातील मुख्य जलवाहिनीवरील अवैध जोडण्या तोडण्याची कारवाई केल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. यामधूनच उपायुक्त माधुरी मडावी यांच्यासह मनपाच्या पथकावर संतप्त ग्रामस्थांनी ७ फेब्रुवारी रोजी दगडफेक केली. ग्रामस्थांच्या कृतीचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठय़ावर झाला असून, व्हॉल्व दुरुस्तीचे साहित्य वेळेवर उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा लांबणीवर गेला आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह यांची भेट घेतली. तसेच वारंवार व्हॉल्व फोडल्या जात असल्याने ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतल्या जाणार होती. अकोलेकरांमध्ये निर्माण झालेला रोष व मनपाची कठोर भूमिका लक्षात घेता, बाश्रीटाकळी ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामसेवकाने आयुक्तांची भेट घेतली. ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची नसून, जिल्हा परिषद प्रशासनाची आहे. तरी सुद्धा मनपाकडून पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतने नियमित पाणीपट्टी जमा केल्यास गावाला मीटरद्वारे पाणी देण्याचा पुनर्विचार होऊ शकतो, असे सोमनाथ शेटे यांनी सांगितले. धरणातील अत्यल्प जलसाठा लक्षात घेतल्यास भविष्यात व्हॉल्व फोडण्याचा प्रकार घडल्यास त्याचे परिणाम संपूर्ण ग्रामस्थांना भोगावे लागतील, असा गर्भित इशाराच यावेळी आयुक्तांनी दिला. यापुढे असे प्रकार होणार नसल्याची ग्वाही ग्रामपंचायत सदस्यांनी मनपा आयुक्तांना दिली...तर रास्ता रोको बाश्रीटाकळी ग्रामस्थांनी मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व फोडल्याने शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. मनपाने व्हॉल्व दुरुस्ती केल्यानंतर दुसर्यांदा व्हॉल्व फोडण्यात आला. या प्रकरणी पोलिसांची भूमिका व मनपा प्रशासनाची होणारी गळचेपी लक्षात घेता, यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना सरसावली असून, बाश्रीटाकळी गावातून होणारी वाहतूक व व्यवसाय ठप्प करण्यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा युवासेनेचे जिल्हाप्रमुख संग्रामभैया गावंडे, सेना नगरसेवक पंकज गावंडे यांनी शुक्रवारी दिला.
अकोला शहरावर जलसंकट
By admin | Updated: February 14, 2015 01:30 IST