अकोला, दि. ३0- पाण्याची बचत काळाची गरज असताना उच्च विद्याविभूषित व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तींकडूनच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास येताच महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी कारवाईचा बडगा उगारत दुर्गा चौकातील ओम हॉस्पिटलचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. शहराला पाणीपुरवठा करणार्या महान धरणात अवघा ३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याची नासाडी टाळून त्याची नेमकी मोजदाद व्हावी, या उद्देशातून मनपाच्या वतीने शहरात जलवाहिन्यांचे जाळे टाकणे, जलकुंभ उभारण्यासह नळांना मीटर लावण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नवीन प्रभागातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असताना, उच्च शिक्षित व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तींकडून मात्र नळाला तोट्या न लावता पाण्याची नासाडी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मनपातील कामकाज आटोपल्यानंतर आयुक्त अजय लहाने रामदासपेठ भागातील जीममध्ये जातात. दुर्गा चौकातील डॉ. प्रवीण पाटील यांच्या ओम हॉस्पिटल समोरून जात असताना आयुक्त लहाने यांना हॉस्पिटलमधून पाण्याचे लोट रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसून आले. आयुक्तांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली असता नळाला तोटी नसल्याचे समोर आले. त्यावेळी हॉस्पिटलमधील उपस्थितांना डॉ. प्रवीण पाटील यांचा भ्रमणध्वनी मागितला असता आयुक्तांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. रुग्णालयातीलच मेडिकलच्या संचालकांनीदेखील भ्रमणध्वनी नसल्याचे सांगत हात वर केले. हा प्रकार पाहून आयुक्तांनी तातडीने मनपाच्या जेसीबी बोलावून घेत हॉस्पिटल आणि मेडिकलचे रस्त्यावर आलेले अतिक्रमण भुईसपाट केले. अन् नळांना तोट्या बसविल्या!आयुक्त अजय लहाने यांच्या कारवाईनंतर दुर्गा चौक, रामदासपेठ भागातील काही नागरिकांनी नळाला तोट्या बसविल्याची माहिती आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी चिन्हं आहेत. अशावेळी पाणी बचतीसाठी अकोलेकरांनी स्वत:च पुढाकार घेण्याची गरज असताना नळाला तोट्या नसल्याचा प्रकार दुर्दैवी असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
पाण्याची नासाडी; हॉस्पिटलचे अतिक्रमण उद्ध्वस्त
By admin | Updated: March 31, 2017 01:50 IST