खेट्री : पातूर तालुक्यातील सायवणी ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन पॅनलने ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडवून दिला आहे. ग्रामपंचायतमध्ये गेल्या २०१०पासून ग्रामविकास पॅनलची सत्ता होती, परंतु दहा वर्षांपासून गावाचा विकास ठप्प झाला होता. गावात घाणीचे साम्राज्य, नाल्या व रस्त्याच्या कामाअभावी गावात संतापाची लाट उसळल्याचे चित्र होते. गावाचा विकास व्हावा, या उद्देशाने सायवणी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते शांताराम ताले यांनी परिवर्तन पॅनलला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. गावाचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन देऊन मतदारांचे मने जिंकून सातपैकी सात उमेदवार निवडून आणले. त्यामुळे गावासह परिसरात शांताराम ताले यांचे कौतुक होत आहे. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भीमराव आत्माराम कौसकार, शांताराम वासुदेव ताले, मनीषा श्रीराम ताली, ज्योती संतोष बुंदे, उज्ज्वला पुरुषोत्तम ताले, कीर्ती देवेंद्र निलखन, दत्तात्रय महादेव ताले यांचा समावेश आहे. आम्ही नक्की गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करू, असे शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे प्रमुख शांताराम ताले, यांनी ‘लोकमत'शी सांगितले. (फोटो) (वा.प्र.)
परिवर्तन पॅनलकडून ग्रामविकास पॅनलचा धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST