राजरत्न सिरसाट / अकोला: पश्चिम विदर्भात १७४ लघू प्रकल्प असून, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव आणि वळण बंधार्यांची यादी मोठी आहे. प्रत्यक्षात यातील किती प्रकल्प, बंधार्यातून शेतकर्यांना सिंचन सुविधा पुरविली जाते, हा प्रश्न नव्याने ऐरणीवर आला आहे. मुलस्थानी जलसंधारण व्हावे, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे.पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्हय़ात १0१ ते २५0 हेक्टर सिंचन क्षमतेचे एकूण १७४ लघू प्रकल्प आहेत. यातील ३0 प्रकल्प अकोला जिल्हय़ात असून, वाशिम जिल्हा ७, बुलडाणा ७४ आणि यवतमाळ जिल्हय़ात ६२ लघू प्रकल्प आहेत. या व्यतिरिक्त पाझर तलाव, कोल्हापुरी आणि वळण बंधार्यांचा आकडा मोठा आहे. अकोला जिल्हय़ातील या सर्व बंधार्यांची आकडेवारी जवळपास ४१३ च्यावर आहे. यात शून्य ते १00 हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेले ७२ पाझर तलाव असून, या तलावांच्या पाण्यावर एकूण २,७८३ हेक्टर सिंचन अपेक्षित आहे. लघू प्रकल्पाची सिंचन क्षमता २,९३४ एवढी आहे. शून्य ते १00 हेक्टर क्षमतेचे २४ छोटे बंधारे आहेत. शून्य ते २५0 हेक्टर क्षमतेचे ६२ कोल्हापुरी बंधारे आहेत. या बंधार्यांची सिंचनक्षमता एकूण ३,४७७ हेक्टर आहे. शून्य ते १00 हेक्टरपर्यंतचे २४ बंधारे असून, त्यातून १,६९८ हेक्टर सिंचन क्षेत्र ओलित होणे अपेक्षित आहे. तसेच शून्य ते १00 हेक्टरपर्यंतचे २१४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पामधून ७७.९६ हेक्टर क्षेत्राला पाण्याची सोय होणे अपेक्षित आहे. तर ११ वळण बंधारे आहेत. यामधून ४६८ हेक्टर असे सर्व प्रकल्प, बंधारे मिळून अकोला जिल्हय़ात १९,१५६ हेक्टर सिंचन व्हायला हवे, पण आजमितीस या प्रकल्पामधून किती सिंचन केले जाते, हाच संशोधनाचा विषय मानला जात आहे. गेल्यावर्षी पुरक पाऊस नसल्याने काही प्रकल्पामध्ये जलसंचय झाला नसल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्येक वर्षाचे नियोजन काय, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
व-हाडातील छोटे बंधारे वा-यावर!
By admin | Updated: February 23, 2015 01:56 IST