व्हीआरडीएल लॅबने नऊ महिन्यात गाठला एक लाख चाचण्यांचा टप्पा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 10:25 IST
VRDL Lab News कमी मनुष्यबळातही अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबने एक लाख ८७६ चाचण्यांचा टप्पा गाठला.
व्हीआरडीएल लॅबने नऊ महिन्यात गाठला एक लाख चाचण्यांचा टप्पा!
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर चाचण्यांसाठी अकोल्यासह परिसरातील जिल्ह्यांना नागपूर येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत होते. दिनांक १२ एप्रिल रोजी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हीआरडीएल लॅब सुरू झाल्याने पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना कोविडच्या काळात मोठा आधार मिळाला. या नऊ महिन्यांच्या कालावधीत कमी मनुष्यबळातही अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबने एक लाख ८७६ चाचण्यांचा टप्पा गाठला. अकोल्यासह शेजारील जिल्ह्यांत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रत्येकाच्याच मनात भीतीचे वातावरण होते. परिसरातील संदिग्ध रुग्णांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात येत. विदर्भातील एकमेव प्रयोगशाळा असल्याने अहवाल मिळण्यास आठ दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत हाेता. याचदरम्यान अकोल्यातील प्रस्तावित व्हीआरडीएल लॅब १२ एप्रिल रोजी सुरू झाल्याने पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांसाठी मोठा आधार ठरली. अत्यल्प मनुष्यबळावर व्हीआरडीएल लॅब सुरू झाली. त्यात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांसह काही दिवस यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यातीलही रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या वाढू लागल्याने प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढू लागला. मध्यंतरी काही तांत्रिक अडचणी आणि सदोष कोविड किटमुळे काही समस्यांचा सामना करावा लागला. मात्र, निरंतर कार्यरत राहून येथील कर्मचाऱ्यांनी एक लाख ८७६ चाचण्यांचा टप्पा गाठला.बुलडाणा, वाशिम येथील लॅबसाठी विशेष सहकार्यबुलडाणा आणि वाशिम येथे व्हीआरडीएल लॅब सुरू करण्यासाठी अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबची विशेष भूमिका राहिली. या दोन्ही लॅबसाठी मार्गदर्शनासह येथील कर्मचाऱ्यांना अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबच्या तज्ज्ञांनी आवश्यक प्रशिक्षणही दिले.अद्ययावत उपकरणांमुळे होतेय वेळेची बचततपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांमधून विषाणूचा ‘आरएनए’ वेगळा केला जातो. या प्रक्रियेसाठी बराचवेळ लागतो. मात्र, यासाठी उपलब्ध अद्ययावत उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होत आहे. त्यामुळे कमी वेळेत जास्त चाचण्या करणे शक्य झाले आहे.सर्वाधिक चाचण्या सप्टेंबर महिन्यातसप्टेंबर महिना कोविड काळातील सर्वाधिक घातक महिना ठरला. त्यामुळे या महिन्यात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढले. या महिनाभरात २१ हजार ८४४ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या तसेच जिल्ह्यातील शिक्षकांच्या चाचण्यांदरम्यान एकाच दिवसात १,८०० पेक्षा जास्त नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासह जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, अधिष्ठाता व जीएमसी प्रशासनाच्या सहकार्याने युद्धपातळीवर जीएमसीत व्हीआरडीएल लॅब सुरू करण्यात आली. त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी सर्वांचेच सहकार्य लाभल्याने उत्तम दर्जाची लॅब अकोल्यात सुरू झाली. कोविड चाचणीचे कार्य या लॅबच्या माध्यमातून निरंतर सुरू राहणार आहे.- डॉ. नितीन अंभोरे, विभागप्रमुख, सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, जीएमसी, अकोला