लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या गावाचे पुनर्वसन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु येथे वास्तव्यास आल्यापासून पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांनी पुन्हा जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी ए. एम. बावने यांनी स्वत: बारुखेडा येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली. दरम्यान, मेळघाटचे आमदार पटेल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुनर्वसीत ग्रामस्थांनी ९ सप्टेंबर रोजी आपल्या मुळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तेल्हारा तालुक्यातील बारुखेडा व नागरतास या दोन गावांचे पुनर्वसन सन २0११ ते २0१५ मध्ये वारी हनुमान येथे करण्यात आले होते. त्यावेळी वन विभागाच्या अधिकार्यांनी पुनर्वसन झालेल्या गावात मूलभूत सोयी व उदरनिर्वाहाचे आश्वासन दिले होते; मात्र दोन्ही गावांतील आदिवासी यांना गेलेल्या जमिनीचा मोबदला पाहिजे तो मिळाला नाही. या गावात आल्यानंतर पाच वर्षांत ७७ लहान-मोठय़ांचा मृत्यू झाल्याने आदिवासी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच येथे शासकीय सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. येथे आरोग्यसेवा उपलब्ध नसून, गावात कोणतेही कार्यालय नाही व मजुरीही मिळत नाही. त्यामुळे येथील आदिवासींनी या गावातून जुन्या गावात जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी येताच वन विभागाचे अधिकारी यांनी बारुखेडा, नागरतास येथे जाऊन तेथील नागरिकांची भेट घेऊन माहिती घेतली. याबाबत मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी येथे सर्व आदिवासी यांना बोलावून सदर बैठकीमध्ये जुन्या गावात ९ सप्टेंबर रोजी परत जाण्याचा निर्णय घेतल्याचे तुकाराम काकडे यांनी सांगितले.
तहसीलदार यांनी गावात जाऊन केली चौकशीतेल्हाराचे तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी बारुखेडा व नागरतास येथे जाऊन आदिवासी यांची भेट घेतली. तेथील मूलभूत सुविधेच्या समस्या जाणून घेऊन तसे निर्देश अधिकार्यांना दिले; मात्र सदर आदिवासी यांनी मृत्यूच्या तांडवामुळे आम्ही येथे राहणार नसल्याचे उपस्थित अधिकारी यांनी सांगितले.