अकोला- अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार्या मुख्य जलवाहिनीवरून बाश्रीटाकळी आणि दगडपारवा परिसरात पुन्हा अवैध पाणी वापर सुरू झाल्याचे रविवारी उघडकीस आले. तीन ठिकाणी जलवाहिनी आणि व्हॉल्व फोडण्यात आल्याचे आढळून आल्याने महापालिका उपायुक्त माधुरी मडावी यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळ गाठून दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. महान ते अकोल्यादरम्यान मुख्य जलवाहिनीवरून बाश्रीटाकळी, दगडपारवा येथे अवैध नळ जोडण्या घेण्यात आल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने अवैध नळ जोडण्या करणार्यावर कारवाई करण्यात आली होती. रविवारी पुन्हा मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी फोडण्यात आल्याचे आढळून आले. जलवाहिनी फोडून अवैधरीत्या पाणी वापर सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने उपमहापौर विनोद मापारी, नगरसेवक अविनाश देशमुख यांनी घटनास्थळावर धाव घेतली. जलवाहिनीवरून मोठय़ाप्रमाणावर गळती होत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी जलप्रदाय विभागाच्या अधिकार्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. उपायुक्त माधुरी मडावी यांच्यासह कार्यकारी अभियंता नंदलाल मेश्राम, कनिष्ठ अभियंता नरेश बावणे यांनी जलवाहिनी दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मुख्य जलवाहिनीवरून अवैध पाणी वापर सुरूच
By admin | Updated: February 23, 2015 01:59 IST