अकोला: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६ डिसेंबर ते २६ जानेवारी दरम्यान महापालिकेच्यावतीने शहरातील दुकानांवरील लावलेल्या अनधिकृत पाट्या, अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कोतवाली चौक, गांधी रोड, जैन मंदिर, फतेह चौक, बस स्थानक, सीताबाई कला महाविद्यालय परिसरातील अतिक्रमणे व दुकानांवरील पाट्या काढल्या. रस्त्यावर केलेले अतिक्रमण व वाहतुकीस अडथळा ठरणारे जाहिरातींचे अनधिकृत होर्डिंग, बॅनर व दुकानांवरील पाट्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून बुधवारी काढण्यात आल्या. काढलेले बॅनर, होर्डिंग व पाट्या मनपाने नष्ट केल्या तसेच बांधकाम साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे धान्य बाजार परिसरातील शब्बीर शाह, मलंक शाह यांच्यावर १0 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. व्यावसायिक, नागरिकांनी जाहिरातींचे अनधिकृत फलक, होर्डिंग, पाट्या आणि रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकावीत, अन्यथा महापालिकेकडून त्यांचे अतिक्रमण काढण्यात येईल व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई पथकातील अधिकारी विष्णू डोंगरे, प्रवीण मिश्रा, विजय बडोणे, संजय थोरात, अँड. प्रवीण इंगोले, सुनील गरड, विनोद वानखडे, सोनू वाहूरवाघ, बाबाराव सिरसाट, तेजराव बनसोड आदींनी केली.
अनधिकृत होर्डिंग्ज, अतिक्रमणाचा सफाया
By admin | Updated: January 28, 2016 00:46 IST