बळीराम वानखडे / खामगाव: तालुक्यातील मांडका या लहानशा गावी सुमारे शंभर वर्षांपूर्वी लक्ष्मणगीर महाराज यांनी समाधी घेतली आहे. तेव्हापासूनच या गावाला अध्यात्मिक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असून, लक्ष्मणगीर महाराजांच्या प्रेरणेतून येथे दहा-बारा वर्षांपासून प्रसादाची अनोखी परंपरा गावकर्यांच्या अन्नदानातून आणि श्रमदानातून राबविली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर दुसर्या वर्षीचा पावसाळा लागेपर्यंत दर शुक्रवारी उडिदाची डाळ आणि ज्वारीच्या भाकरीचा प्रसाद वितरित करण्यासाठी मांडका येथील ग्रामस्थांची धडपड सुरू असते. मांडका येथील ग्रामदैवत असलेले लक्ष्मणगीर महाराजांच्या अनुभूतीमुळे मांडकासह शिरसगाव देशमुख, गोंधनापूर, रोहणा, वर्णा, काळेगाव, हिवरा, पोरज, भालेगाव बाजार, ढोरपगाव या परिसरातील भाविकांची लक्ष्मणगीर महाराजांवर अपार श्रद्धा आहे. महाराज आजही आपल्यात असल्याची अनुभूती अनेकांना येत असल्याने त्यांच्या दृष्टातांनुसार येथील भाविक दर शुक्रवारी मनोभावे उडिदाची दाळ आणि ज्वारीच्या भाकरीचा महाप्रसाद तयार करण्यासाठी मेहनत घेता त. श्रमदानातून सातत्याने दर आठवड्याला राबविण्यात येणारा हा जिल्हा आणि परिसरातील एकमेव उत्सव आहे. बाहेरगावचे भाविकसुद्धा प्रसाद घेण्यासाठी येथे येत असतात.
**मजुरी पाडून महिला देतात स्वयंपाकाची सेवा
मांडका या गावातील महिला दर शुक्रवारी दीड ते दोन क्विंटल ज्वारीच्या भाकरी तयार करण्यासाठी नियमित सेवा देतात. महाप्रसादासाठी लागणार्या भाकरी तयार करण्यासाठी दुपारी ४ वाजतापासूनच सुरुवात होते. त्यामुळे या दिवशी महिला शेतात मजुरीसही जात नाही. पुरुष मंडळीदेखील या दिवशी इतर महत्त्वाच्या कामासह मजुरीस जाण्याचे टाळतात.