मूर्तिजापूर (जि. अकोला) : जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य तथा तालुक्यातील हातगाव येथील माजी सरपंच रवींद्र महादेव गोपकर (४0) यांचे गुरुवार, २४ मार्च रोजी कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील तुरखेड फाट्याजवळ झालेल्या अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांचे मित्र जयंत देशपांडे यांचाही मृत्यू झाला असून, अन्य दोघे जण जखमी झाले. रंगपंचमीच्या दिवशी गुरुवारी रवींद्र गोपकर हे त्यांचे मित्र जयंत देशपांडे, दीपक मेहरे, नितीन वसंतराव शिंदे व चालक बादल श्रीकृष्ण वाकोडे यांच्यासह एम. एच. ३0 ए. एफ. ८७३८ क्रमांकाच्या मारुती अल्टो या चारचाकी वाहनाने कारंजाकडे जाण्यास निघाले. दुपारी दोन ते अडीच वाजताचे दरम्यान कारंजा मार्गावरील तुरखेड फाट्यावरील प्रवासी निवार्याजवळ आले असता, त्यांचे वाहन रिव्हर्स गिअरमध्ये निंबाच्या झाडावर जाऊन आदळले. ही धडक एवढी जबरदस्त होती, की मागच्या सिटवर बसलेले रवींद्र गोपकर व जयंत देशपांडे हे जागीच ठार झाले, तर नितीन शिंदे व दीपक मेहरे हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यानंतर जखमींना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; यापैकी मेहरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. रवींद्र गोपकर हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या अपघाताची वार्ता पसरताच भारिप-बमसंचे पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांनी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. रवींद्र गोपकर यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे.
रस्ता अपघातात जिल्हा परिषद सदस्यासह दोन ठार
By admin | Updated: March 26, 2016 02:33 IST