अकोला, दि. ३0-सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पातूर तालुक्यातील सुकळी येथील जंगलीमन दादाराव गवई यांनी सुकळी शिवारातील शेतात २८ मार्च मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान विषारी औषध प्राशन केले होते; मात्र त्यांना ताबडतोब अगोदर चतारी येथील रुग्णालयात व नंतर लगेच अकोला येथील सामान्य रुग्णालयात भरती केले होते; मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे चान्नी येथील मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्याचे समजते. त्यांना एक पाच वर्षाचा मुलगा व एक महिन्याची मुलगी, पत्नी, आई व दोन भाऊ असल्याचे समजते. बुधवार २९ मार्च रोजी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आस्टुल येथील सुनील विश्वनाथ तवाले या ३५ वर्षीय शेतकर्याने २९ मार्च रोजी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीत सतत नापिकी होत होती. त्यांनी बँकेकडून व इतर कर्ज घेतले होते. परतफेड करण्याच्या सतत विवंचनेत त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे आई, पत्नी, २ मुले, १ मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे.
कर्जाला कंटाळून दोन शेतक-यांची आत्महत्या
By admin | Updated: March 31, 2017 02:33 IST