अकोला: भाववाढीला आळा घालण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकार्यांनी शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या. त्यामध्ये येवता रोडवरील एमआयडीसी क्रमांक ४ स्थित एम.के.कोल्ड स्टोरेज आणि पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोरेजमधून विना परवाना १ कोटी ८२ लाख ३७ हजार ७५0 रुपये किमतीचा कडधान्य साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या कडधान्याच्या साठय़ात हरभरा, मूग व तूर साठय़ाचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्या नेतृत्वातील अधिकार्यांच्या पथकाने अकोला शहराजनजीक असलेल्या येवता रोडवरील एमआयडीसी क्र.४ मधील संदीप कचोलिया यांच्या मालकीच्या एम.के. कोल्ड स्टोरेजमध्ये धाड टाकली. यावेळी गोदामातील साठय़ाची तपासणी करण्यात आली असता, उपलब्ध सात-बारावर पेरा नोंद आढळून आली नाही. तसेच सात-बारा उपलब्ध नसणे व परवान्यावर साठवणुकीबाबत कोल्ड स्टोरेजची नोंद नसल्याचे आढळून आले. पुरवठा व महसूल विभागाच्या अधिकार्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या तपासणीत १ कोटी ८२ लाख ३७ हजार ७५0 रुपयांचा २ हजार ४२१ क्विंटल कडधान्याचा साठा जप्त करण्यात आला.
दोन कोटींचा कडधान्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 01:57 IST