आकोट : मध्यप्रदेशातून आकोट येथील बाजारात आंबे घेऊन येणार्या ट्रकचालकाची ट्रकमध्येच गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात मारेकर्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी ट्रकच्या क्लिनरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृतक रमेशचंद्र हिंदूलाल बलाई (वय २१ वर्षे) रा. धुम्मा पिपलिया ठाणा जालडा जि. उज्जैन हा शाहीदभाई रा. महिदपूर जि. उज्जैन याच्या ट्रक क्र. एमपी 0९ एचजी ६५१३ वर चालक म्हणून गत ९ महिन्यापासून काम करीत आहे. त्याच्यासोबत रामलखन शंकरलाल प्रजापत (वय २३) रा. अैक्या जैस्या पो. संकरखेडी तहसील महीदपुरी जिल्हा उज्जैन हा क्लिनर म्हणून राहत आहे. हे दोघेही उज्जैनहून माल घेऊन चेन्नई व तेथून तिरुपती बालाजी येथे गेले. तेथून ४ जुलै रोजी आंबे घेऊन आकोटकडे निघाले. ६ जुलै रोजी रविवारी हा ट्रक आकोटात आला. तिथे आंबे उतरवल्यानंतर आंबे खरेदी करणार्या व्यापार्याने मृतक रमेशचंद्र याच्याकडे ४७ हजार ९00 रुपये दिले. त्यानंतर केजीएन ट्रान्सपोर्टने दिलेले भाडे घेऊन ही मंडळी ८ जुलै रोजी भिलाई येथे जाणार होते. त्यासाठी त्यांनी आकोट येथेच मुक्काम केला. ट्रकचा वाहनचालक ट्रकच्या कॅबिनमध्ये, तर क्लिनर मागील बाजूस झोपले. सकाळी क्लिनरने वाहन चालकास उठविले असता तो मृतावस्थेत आढळून आला. तपासणी केली असता रमेशचंद्र बलाई याची गळा आवळून हत्या झाल्याचे ध्यानात आले. ट्रकच्या क्लिनरने पोलिसात फिर्याद नोंदविली. त्यावरून आकोट पोलिसांनी भादंवि ३0२ अन्वये अज्ञात मारेकर्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासासाठी क्लिनरला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शहरात श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पुढील तपास पोउनि प्रेमानंद कात्रे करीत आहेत.
गळा आवळून ट्रकचालकाची हत्या
By admin | Updated: July 9, 2014 00:28 IST