अकोला : महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदासह महिला व बालकल्याण समिती तसेच झोन समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया उद्या गुरुवारी मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडेल. ह्यस्थायीह्णच्या सभापती पदासाठी बाळ टाले तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी सारिका जयस्वाल यांचे दाखल झालेले उमेदवारी अर्ज पाहता ही निवड प्रक्रिया बिनविरोध होणार आहे. महापालिकेत १६ सदस्यीय स्थायी समितीच्या गठनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुख्य सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत १६ सदस्यांची निवड करण्यात आली होती. सदस्य निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी देत सभापती पदाच्या निवडीसाठी ११ मे ही तारीख निश्चित केली. स्थायी समिती, महिला व बालकल्याण समितीसह झोननिहाय समित्यांसाठी ९ मे रोजी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपच्या वतीने बाळ टाले तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी सारिका टोलू जयस्वाल यांची निवड करण्यात आली. दोन्ही समित्यांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाल्याने उद्या गुरुवारी मनपाच्या सभागृहात निवड प्रक्रियेची केवळ औपचारिकता निभावली जाणार आहे. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय कामकाज पाहतील.
आज सभापतींच्या निवडीची औपचारिकता
By admin | Updated: May 11, 2017 07:27 IST