अकोला: महापालिकेत स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असता भाजपचे बाळ टाले तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी भाजप नगरसेविका सारिका जयस्वाल यांची अविरोध निवड झाली. मनपाच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात १६ सदस्यीय स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समिती तसेच झोननिहाय समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी पार पडली. एकूण ८० जागांपैकी ४८ जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी झाल्यामुळे स्थायी समितीसह इतर समित्यांमध्ये भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहील, हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपच्या वतीने नगरसेवक बाळ टाले यांनी तसेच महिला व बाल कल्याण समितीसाठी सारिका टोलू जयस्वाल यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. झोन समिती सभापतीसाठी उत्तर झोन वगळता पूर्व, पश्चिम व दक्षिण झोनकरिता भाजपच्या तीन नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज होते. स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत सभापती पदासाठी इतर कोणत्याही राजकीय पक्षाकडून उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे भाजपचे बाळ टाले यांच्यासह महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी सारिका जयस्वाल यांची अविरोध निवड करण्यात आली. सभेचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी नवनिर्वाचित सभापती बाळ टाले, सारिका जयस्वाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहर विकासाच्या योजना पूर्ण करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी प्रशासनाची साथ अपेक्षित आहे. पक्षाने दर्शविलेल्या विश्वासामुळे जबाबदारीत वाढ झाली आहे. ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.- बाळ टाले, सभापती पदग्रहण सोहळा ह्यस्थायीह्णच्या सभापती पदावर बाळ टाले यांची निवड होताच भाजपने त्यांचा छोटेखानी पदग्रहण सोहळा आयोजित केला होता. महापौर विजय अग्रवाल, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, उपमहापौर वैशाली शेळके, गटनेता राहुल देशमुख, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, महिला व बाल कल्याण समिती सभापती सारिका जयस्वाल, सुमनताई गावंडे, योगिता पावसाळे, नंदा पाटील, रंजना विंचनकर, अनिता चौधरी, जयश्री दुबे, विजय इंगळे, अजय शर्मा, मिलिंद राऊत, श्याम क्षीरसागर, अमोल गोगे आदी उपस्थित होते. मनपात फटाक्यांची आतषबाजी मनपा स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समिती तसेच चार पैकी तीन झोन समित्यांवर भाजपचा झेंडा फडकताच महापालिका आवारात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली. तसेच पेढे,मिठाई वाटून आनंद साजरा केला.
‘स्थायी’च्या सभापतीपदी बाळ टाले!
By admin | Updated: May 12, 2017 08:16 IST