मलकापूर (जि. बुलडाणा) : जवळच असलेल्या दसरखेड एमआयडीसीमध्ये इको बायोटेक केमीकल कंपनीच्या इटीपी सांडपाण्याची टाकी साफ करीत असतांना उन्हामुळे त्यात अचानक गॅस तयार होऊन तीन मजुरांचे जीव गुदमरल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान एमआयडीसी परिसरातील इको बायोटेक कंपनीमध्ये घडली. येथील एमआयडीसी स्थित इको बायोटेक कंपनीमध्ये नेहमीप्रमाणे कंपनीच्या सांडपाण्याचे सुमारे ८ ते १0 फुट खोल असलेल्या इटीपी टॅकमधील घाण अतुल प्रविण धायडे (वय ३0) रा.घोडसगाव हा मजूर साफ करीत होता. यादरम्यान उन्हामुळे या टाक्यात गॅस तयार झाल्याने त्याचा जीव गुदमरल्याने तो त्याच ठिकाणी अत्यवस्थ होवून बेशुध्द पडला. हा प्रकार पाहिल्यानंतर त्याला वर काढण्यासाठी तेथील मजुर राहुल गाडे व निना धर्माळ यांनी अतुल प्रविण धायडे याला बाहेर काढण्याकरिता टाक्यात प्रवेश केला. मात्र मदतीसाठी उतरलेले दोन मजूर सुध्दा बेशुध्द होवून कोसळले. यानंतर इतरांनी सावधगिरी बाळगत या तिघांना टाक्याबाहेर काढून शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर यातील राहुल गाडे या मजुरास प्राथमिक उपचार करुन बुलडाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तसेच अतुल धायडे याचीही प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले आहे. एमआयडीसीमध्ये पोलिस स्टेशन असल्यावरही त्यांना या घटनेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
केमिकल कंपनीत गॅसमुळे गुदमरुन तीन मजूर गंभीर
By admin | Updated: April 25, 2015 02:16 IST