अकोला: प्रसिद्ध व्यावसायिक किशोर मदनलाल खत्री हत्याकांडातील तिसरा आरोपी अंकुश चंदेल याला बुधवारी जुने शहर पोलिसांनी अटक केली. हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार रणजितसिंह ऊर्फ भाईजी चुंगडे यांच्या बंद पडलेल्या सफारी कारला टोइंग करण्यासाठी ट्रॉलीसह आणलेला ट्रॅक्टर जुने शहर पोलिसांनी जप्त केला आहे. चंदेल याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. बालाजी मॉलच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून रणजितसिंह चुंगडे यांनी किशोर खत्री यांची निर्घृण हत्या केली होती. ३ नोव्हेंबर रोजी सोमठाणा शेतशिवारामध्ये किशोर खत्री यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांची हत्या चुंगडेंनी केल्याचा आरोप दिलीप खत्री यांनी केला होता. घटनेपासून चुंगडे हे फरार झाले होते. चुंगडे व त्यांचा चालक राजीवसिंह नारायणसिंह मेहर हे ८ नोव्हेंबर रोजी जुने शहर पोलिसांना शरण आले. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोघांनाही १४ नोव्हेंबरपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून गीतानगरात राहणारा अंकुश चंदेल याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्यालाही बुधवारी बेड्या घातल्या. चुंगडे यांनी किशोर खत्री यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह सफारी कारमध्ये घातला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात असतानाच, वाटेच कारमधील पेट्रोल संपले. त्यामुळे राजीवसिंह मेहर याला फार्म हाऊसवरील ट्रॅक्टर घेऊन बोलाविले. कार दोराने ट्रॅक्टरला बांधून फार्म हाऊसला आणण्यात आली आणि त्यानंतर चुंगडेंसह मेहर व चंदेल यांनी खत्री यांचा मृतदेह सोमठाणा शेतशिवारामध्ये फेकून दिला, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
किशोर खत्री हत्याकांडातील तिसरा आरोपी गजाआड
By admin | Updated: November 13, 2015 02:05 IST