लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: एका घरात घुसून चोरी केल्याप्रकरणी २ मे १९९३ रोजी सिव्हिल लाइन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. सैंदाणे यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन एका आरोपीस न्यायालयाने १३ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने १८ वर्षांनंतर चोरी प्रकरणात निकाल दिला. आरोपींपैकी एकाचा मृत्यू झालेला असून, त्याचे नाव यातून वगळण्यात आले, तर दुसरा आरोपी आणखी एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे. भीम नगरात राहणारे श्रीकृष्ण ओंकार खंडारे यांनी २ मे १९९३ रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून घरातील डेग मशीन चोरून नेली. श्रीकृष्ण खंडारे यांनी यासंदर्भात शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, भीम नगरात राहणारे आरोपी विद्यवान बळीराम प्रधान, संजय मधुकर आठवले आणि काशिराम प्रधान(मृत) हे संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती त्यांना दिली. त्यामुळे खंडारे यांनी तिघांविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी काशिराम प्रधान हा तक्रारकर्त्याला डेग मशीन नेताना दिसून आला होता. पोलिसांनी याप्रकरणी दोघा आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीमध्ये सरकार पक्षाने एक साक्षीदार तपासला. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून आरोपी संजय आठवले याला कलम ४५७ नुसार १३ दिवसांचा कारावास आणि ५00 रुपये दंड, दंड न भरल्यास ५ दिवसांची साधी कैद आणि कलम ३८0 नुसार १३ दिवसांचा कारावास, अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ जी.एल. इंगोले यांनी बाजू मांडली.
चोरट्यास तेरा दिवसांच्या कारवासाची शिक्षा
By admin | Updated: June 16, 2017 00:42 IST