पळशी बु. : येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पुढाकाराने व गावकर्यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांंची अधिकाधिक शैक्षणिक प्रगती व्हावी, या हेतूने गावात ठिकठिकाणी चौक तेथे शाळा व भिंत तेथे फळा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रम अंतर्गत गावातील चौकातील घरांच्या भिंतीवर काळा रंग लावून फळा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे बालक या चौकातील भिंतीवर शाळा सुटल्यानंतरही अक्षरे गिरवत आहेत. या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून सुरु झालेल्या या उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव जयराम लाड हे होते. तसेच यावेळी जि.प. सदस्य शांताराम पाटेखेडे, सरपंच सौ.मिराताई सदानंद धनोकार यांचे हस्ते चौक तेथे शाळा व भिंत तेथे फळा या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला भास्कर लक्ष्मण पल्हाडे यांचे स्मृतीप्रित्यर्थ राजेंद्र भास्कर पल्हाडे यांचेकडून ५ हजार रूपये, स्व.मारोती सुर्यभान घाटोळ यांचे स्मृतीप्रित्यर्थ डॉ.रविंद्र मारोती घाटोळ यांचेकडून २ हजार रूपये, स्व.तुळशिराम कान्हूजी पानझाडे यांचे स्मृतीप्रित्यर्थ भास्कर तुळशिराम पानझाडे यांचेकडून १५00 रूपये, स्व. सुलोचना वामन धनोकार यांचे स्मृतीप्रित्यर्थ शाम वामन धनोकार यांचेकडून १ हजार रूपये अशी देणगी सुध्दा मिळाली. तसेच या कार्यक्रमाला ग्रामपंचायतकडून सुध्दा सहकार्य मिळणार आहे. यावेळी मुख्याध्यापक एस.बी. मसने, डॉ.सदानंद धनोकार, पोलीस पाटील सौ. कल्पना संजय सुरवाडे, सौ.रत्नाबाई शेगोकार, सुरेश गव्हाळ, महात्मा फुले वाचनालयाचे अध्यक्ष रामकृष्णा अकर्ते तसेच विद्यार्थ्यांंंसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या अनोखा उपक्रमाची फलश्रुती दिसत असून शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी आवडीने भिंतीवरील फळ्यावर अक्षरे गिरवत आहेत.
चौक तेथे शाळा व भिंत तेथे फळा
By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST