बाभूळगाव जहाँगीर (जि. अकोला) : राज्यभर गाजत असलेल्या नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींच्या अत्याचारप्रकरणी रोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. विद्यालयातील शिक्षक स्वत:च्या घरची कामं विद्यार्थ्यांकडून करून घेत होते. यामध्ये शिक्षिका आघाडीवर होत्या. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र या तक्रारी थंडबस्त्यात ठेवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नवोदय विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींच्या अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिक्षकांची चांगलीच कानउघाडणी केली होती. शनिवारी खासदार संजय धोत्रे यांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली होती. जवाहर नवोदय समितीच्या पुणेस्थित साहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील चमूनेही चौकशीला प्रारंभ केला. या चौकशीतून विद्यालयातील शिक्षकांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. शिक्षिका इयत्ता ११ वीतील विद्यार्थी आणि ९ वीतील विद्यार्थिनींना रात्री-अपरात्री घरकामासाठी बोलावित होत्या. या विद्यार्थ्यांना अभ्यासावर पाणी सोडून शिक्षकांची ह्यसेवाह्ण करावी लागत असे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या; मात्र प्रशासनाने त्या थंडबस्त्यात ठेवल्या. त्यामुळे एका विद्यार्थिनीने थेट साहाय्यक आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीमुळे येथील शिक्षकांचे पितळ उघडे पडले होते. विद्यालयातील अत्याचार आणि मनमानी कारभार रोखण्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठांवरही कारवाई करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले होते घरगडी!
By admin | Updated: April 6, 2015 02:12 IST