आकोट : येत्या जून-जुलैमध्ये होणार्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार यादीत नावे नसलेले उमेदवार निवडणूक लढवू शकतात किंवा नाही, यासंदर्भात स्पष्ट दिशानिर्देश देण्याची मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने अमरावती विभागीय आयुक्तांना केली आहे.यासंदर्भात शिक्षक मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त अमरावती यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष अजय घनबहादूर यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत शिक्षक मतदार संभ्रमात सापडले असून, या निवडणुकीसाठी उमेदवाराचे निकष माहीत नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. ही निवडणूक येत्या जून-जुलैमध्ये होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने अनेक इच्छुकांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे; परंतु यामध्ये काही उमेदवार शिक्षकच नाहीत तर काही सेवानिवृत्त शिक्षक आहेत. शिक्षक मतदारसंघ निवडणूक यादीत यांची नावेही नाहीत. कोणत्याही निवडणुकीचा उमेदवार हा त्या मतदारसंघाचा मतदार असणे गरजेचे आहे. असे असताना या निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नसलेले उमेदवार प्रचार करीत आहेत. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी या मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे किंवा कसे, यासंदर्भात मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अमरावती विभागीय आयुक्त यांनी स्पष्ट दिशानिर्देश द्यावेत, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष (माध्य. व उच्च माध्य.) अजय घनबहादूर यांनी केली आहे.
निवडणुकीच्या मुद्यावरून शिक्षक संभ्रमात
By admin | Updated: May 15, 2014 19:38 IST