राजरत्न सिरसाट /अकोलाआर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम वर्हाडातील सिंचनाचा अनुशेष कायम आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांतील १९ प्रकल्पांपैकी ११ लघु, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांच्या कामांची गती खुंटली आहे. या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यास या तीन जिल्ह्यांत ४३ हजार ५८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अकोला जिल्ह्यातील आठ सिंचन प्रकल्पांपैकी हिवरा आणि सुकळी या लघुप्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. या दोन प्रकल्पांतून जेमतेम १,४५६ हेक्टर क्षेत्रावरील सिंचन झाले आहे. उर्वरित प्रकल्पांची कामे पूर्ण झाली नसल्याने ३३ हजार ५२८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाला मुकले आहे. ज्या प्रकल्पाची कामे रखडली आहेत, त्यामध्ये कवठा शेलू, नया अंदुरा, वाई,कवठा बॅरेज, शहापूर, पोपटखेड -२ या लघुप्रकल्पांचा समावेश असून, उमा व नेरधामणा हे दोन बॅरेज आहेत. वाशिम जिल्ह्यातील सुरवंडी, कुत्तरडोह या प्रकल्पांची कामे अर्धवट असून, जयपूर प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झाले नाही. या जिल्ह्यात चारपैकी धारपिंप्री हा एक प्रकल्प तयार झाला आहे. या प्रकल्पातून ४0७ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे. या जिल्ह्यातील अर्धवट असलेल्या तीन प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यास ४,३२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.
व-हाडातील सिंचन प्रकल्पांचे भिजत घोगंडे
By admin | Updated: November 19, 2014 02:15 IST