अकोला: स्थायी समिती सदस्य निवड प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप करीत ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुषंगाने विशेष सभेतील बैठकीचे कार्यवृत्त, पक्षीय बलानुसार निश्चित झालेले संख्याबळ व सदस्य निवडीबाबतचा विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांना पत्राद्वारे दिले आहेत.महापालिकेच्या सोळा सदस्यीय स्थायी समितीचे पुनर्गठन करण्यासाठी ७ एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. तौलानिक संख्याबळाचा मुद्दा उपस्थित करून भारिपचे गटनेता गजानन गवई यांनी दोन सदस्यांची निवड करण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर अकोला विकास महासंघाचे गटनेता सुनील मेश्राम यांनी आक्षेप घेत महापौरांना नियमानुसार सदस्य निवड करण्याची विनंती केली. तांत्रिक बाब निर्माण झाल्याची सबब पुढे करीत महापौर उज्ज्वला देशमुख यांनी सभा स्थगित केली. त्यानंतर पुन्हा १३ एप्रिल रोजी स्थगित सभेचे आयोजन केले असता, महापौरांनी अकोला विकास महासंघातील एका सदस्याला डावलून भारिप-बमसंच्या सदस्याची निवड केल्याचा आक्षेप महासंघाचे गटनेता सुनील मेश्राम यांनी नोंदवला. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे तक्रारही केली. मेश्राम यांच्याप्रमाणेच अकोला शहर विकास आघाडीचे गटनेता गंगा शेख बेनीवाले यांनी सुद्धा विभागीय आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तक्रारीचे स्वरूप लक्षात घेता, विभागीय आयुक्तांनी विशेष सभेचे कार्यवृत्त तसेच इत्थंभूत पार पडलेल्या प्रक्रियेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले आहेत.
स्थायी समितीचा अहवाल सादर करा
By admin | Updated: April 16, 2015 01:37 IST