नवीन मोदे / धामणगाव बढे (जि. बंलडाणा): ग्रामीण भागातील होतकरू, गरीब विद्यार्थ्यांची काहीतरी करून दाखविण्याची इच्छा, अभ्यासासाठी येणार्या अडचणी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, त्यासाठी विद्यार्थ्यांंची होणारी परवड यामुळे धामणगाव बढे येथील तरुणाई अस्वस्थ झाली. या अस्वस्थतेतून सहा महिन्यांपूर्वी येथे अभ्यासिका अस्तित्वात झाली. त्या अभ्यासिकेत घेतलेल्या मार्गदर्शनातून दोन युवकांना चांगली नोकरी मिळाली. हे यश पाहून अभ्यासिकेच्या या संकल्पनेला अनेकांनी मदतीचा हात दिला. सर्वांना प्रेरणादायी असा उपक्रम मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे तरुणांच्या माध्यमातून राबविला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या विद्यमान युगात पैशांअभावी शहरात जाऊन स्पर्धा परीक्षेसाठी शिकवणी लावू शकत नाहीत. त्यामुळे क्षमता असतानासुद्धा अनेक युवकांना नोकरीच्या संधी गमवाव्या लागत होत्या. येथील तरुणांनी ही खंत तत्कालीन सरपंच भागवत दराखे, ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्याकडे बोलून दाखविली. त्याची तत्काळ दखल घेत सरपंच दराखे यांनी ग्रामपंचायतीच्या सचिवालयाचा हॉल तरुणांना उपलब्ध केला. या हॉलची स्वच्छता, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था या तरुणांनी रात्री-रात्र जागत पूर्ण केली. अभ्यासिकेसाठी लागणारा खर्च हीसुद्धा महत्त्वाची बाब तरुणांपुढे होती. याची माहिती मिळताच बुलडाणा येथील प्रा. एस.डी. गोरे यांनी आपल्या आईचे वर्षश्राद्ध न करता ११ हजार रुपयांचा निधी अभ्यासिकेला दिला. अभ्यासिकेत लागणारी पोलीस भरती, एमपीएससी, पोस्ट, बँकेच्या स्पर्धा परीक्षेची पुस्तके, महिला व बाल कल्याण अधिकारी कंकाळ यांनी उपलब्ध करून दिली. १४ मार्च २0१५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या कामकाजाला प्रारंभ झाला.
तरुणाईच्या संकल्पनेतून साकारली अभ्यासिका
By admin | Updated: September 7, 2015 01:34 IST