गिरीश राऊत/ खामगावइयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश देण्यासाठी कुठे पाच वर्ष, तर कुठे सहा वर्ष पूर्ण असण्याची अट आहे. राज्यात सर्वच शाळांमध्ये प्रवेशासाठी वयोर्मयादा ही सारखीच असावी, यासाठी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेताना विद्यार्थ्याला वयाची पाच वर्ष पूर्ण करण्याचा निकष लागू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाची अट निश्चित करण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे विविध स्तरावर संशोधन करण्यात आले होते. त्यासाठी काही समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रकार सातत्याने घडतात. पुणे आणि मुंबईमध्ये शिक्षण हक्क कायद्याच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान या प्रकारामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या पृष्ठभूमिवर शालेय प्रवेशासाठी राज्यभरात एकसमान धोरण असावे, यासाठी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या एक सदस्यीय समितीवर यासंदर्भातील संभाव्य उपायांचा विचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार माने समितीने अहवाल तयार केला असून, तो सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ३१ जुलै रोजी ५ वर्षे ११ महिने पूर्ण करणार्या बालकांनाच पहिलीला प्रवेश दिला जावा, अशा सूचना या अहवालामध्ये करण्यात आल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण हक्क कायद्यामधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाबाबतचे वेळापत्रकदेखील लवकरच जाहीर केले जाणार आहे.
प्रवेशासाठी विद्यार्थ्याची वयोर्मयादा राहणार एकसारखी!
By admin | Updated: October 31, 2014 00:18 IST