जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रशासनातील महत्त्वाचे घटक असलेले पोलीस स्टेशन प्रभारी, गटविकास अधिकारी ते ग्रामसेवक, तहसीलदार ते मंडळ अधिकारी, तलाठी इ. सर्वांशी जिल्हाधिकारी पापळकर यांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पोलीस उप अधीक्षक सचिन कदम, उप जिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशनचे प्रभारी, गटविकास अधिकारी आदी सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये लहान लहान गावांतून लोकांची ये जा सुरु असते, त्यावर नियंत्रण आणावे असे निर्देश दिले. तर पोलीस अधिकाऱ्यांनी अकारण फिरणारे, दुकानांवर होणारी गर्दी, अकारण होणारी वाहतूक यावर नियंत्रण मिळवावे,असे निर्देश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले. तर जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, निर्बंधांची अंमलबजावणी अधिक कडक पद्धतीने कशी करता येईल, यासाठी तालुका व उपविभागीय स्तरावर बैठक घेऊन नियोजन करावे. आपापल्या कार्यक्षेत्रात होत असलेले विवाह समारंभांवर करडी नजर ठेवावी. गावातून बाहेर गावी जाण्या येण्यासाठी सबळ (बहुदा वैद्यकीय ) कारण असल्याशिवाय परवानगी देऊ नये. ज्या ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागातील चाचण्या वाढविल्या पाहिजेत. प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी केल्यास ग्रामीण भागात होत असलेला फैलाव आपण रोखू शकू,असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.