अकोला: पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण निर्मूलन पथक बांधकाम पाडण्यास गेले असता, अतिक्रमणधारक हारूण खान रशिद खान व अब्दुल रहिम शेख कालू यांचे बांधकाम जेसीबीने पाडायला सुरुवात केल्यावर दोघा आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून पथकाला बांधकाम पाडण्यास विरोध केला. परंतु पथकाने कारवाई सुरूच ठेवल्याने शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने पथकावर तुफान दगडफेक केली. यात जेसीबीच्या काचा फुटून चालक तेजराव महादेव बनसोड (४९) हे जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गडंकी रोडवरील जुल्फकारनगरात घडली. जुल्फकारनगरातील एका दर्गा ट्रस्टजवळील जागेवर दोन जणांनी अतिक्रमण करून त्यावर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार दर्गा ट्रस्टने महापालिकेकडे केली. तक्रारीवरून मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी अतिक्रमण केलेल्या जागेवरील बांधकाम पाडण्याचा आदेश दिला. महापालिकेचे उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने, पश्चिम क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाळकर, राजेंद्र घनबहादूर, अतिक्रमण अधिकारी विष्णू डोंगरे, प्रमुख साहाय्यक प्रशांत बोळे, नगर रचना विभागाचे राजेंद्र टापरे, आरोग्य निरीक्षक प्रकाश बामनेट यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी कर्मचारी जेसीबी घेऊन जुल्फकारनगरातील बांधकाम पाडण्यास गेले. यावेळी पथकाला आरोपी शेख अन्वर शेख याकुब (२१), मोहम्मद रियाज मोहम्मद सिराज (३२), अलमशा हुसैन मुस्ताक हुसैन (३३), मोहम्मद अफसर मोहम्मद याकुब (२४), हारूण खान रशिद खान यांनी अतिक्रमण पाडण्यास विरोध केला आणि शंभर ते दडीशे लोकांचा जमाव जमवून पथकावर तुफान दगडफेक केली आणि जेसीबीच्या काचा फोडून ४0 हजार रुपयांचे नुकसान केले. दगडफेकीमुळे एकच धावपळ उडाली होती. यात जेसीबी चालक जखमी झाला. वासुदेव वाघाळकर यांच्या तक्रारीनुसार, डाबकी रोड पोलिसांनी २५ जणांविरुद्ध भादंवि कलम ३0९ नुसार गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली.
अकोल्यात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक
By admin | Updated: April 17, 2015 01:57 IST