आलेगाव (पातूर, जि. अकोला) : पातूर तालुक्यातील आलेगाव येथे जुगार अड्डय़ावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकावर आरोपींनी दगडफेक केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या तुलंगा येथे गुटख्याचा अवैध साठा जप्त करण्याची कारवाई केल्यानंतर विशेष पथकास आलेगावात जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार या पथकाने रात्री दहा वाजताच्या सुमारास तेथे छापा मारला. पोलिसांचा सुगावा लागताच जुगार खेळणारे पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, या आरोपींनी विशेष पथकावर दगडफेक केली. यात तीन पोलिस किरकोळ जखमी झाले. चान्नी पोलिसांनी याप्रकरणी फरार आरोपी अय्याजोद्दीन उर्फ बंडू, अ. जहीर अ. मुनाफ, सलीमोद्दीन शहाबुद्दीन, सै. साबीर सै. बशिर, निसारखाँ जाहेदखाँ, इमानखान उर्फ इमू, गोपाल धाईत, अ. अजहर तसेच इतर दहा जणांविरुद्ध भादंवीच्या १४७, १४८, १४९, ३५३, ३३६, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. चान्नीचे ठाणेदार विष्णुकांत गुट्टे पुढील तपास करीत आहेत.
आलेगावात ‘एसपीं’च्या विशेष पथकावर दगडफेक
By admin | Updated: December 9, 2014 00:27 IST