लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : काेराेना संसर्गामुळे बंद असलेल्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत. तसेच जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या; परंतु, अद्याप बस सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
काेराेनापूर्वी जिल्ह्यात असलेल्या पाच आगारांतून दिवसाला एकूण ८०० बसफेऱ्या होतात. सद्य:स्थितीत ६०० बसफेऱ्या होत आहेत. अद्याप जिल्ह्यातील १०० बसफेऱ्या बंद असल्याने या बसच्या भरवशावर असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या पालकांकडे आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची व्यवस्था आहे, ते त्यांना शाळेत पाठवीत आहेत; परंतु ज्यांच्याकडे व्यवस्थाच नाही त्यांचे मात्र नुकसान हाेत आहे. जिल्ह्यातील अकोला १ आणि अकोला २ सह अकोट, तेल्हारा आणि मूर्तिजापूर आगारांतील ग्रामीण भागात जाणाऱ्या बसफेऱ्या बंद आहेत.
(प्रतिनिधी)
------------------
जिल्ह्यात या मार्गावर एस.टी.ची एकही फेरी नाही
लाॅकडाऊनपूर्वी १७५ बसफेऱ्या सुरू हाेत्या. सध्या १६० बसेस सुरू आहेत. यामध्ये रिसाेड तालुक्यातील शेलू खु., नावली-मालेगाव, हराळ-गाेरेगाव या रस्त्यावर एकही बस सुरू झालेली दिसून येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत आहे.
------------
कोरोनाआधी किती बसेस धावत होत्या?
जिल्ह्यात काेराेनाआधी एकूण ८०० बसफेऱ्या व्हायच्या. काेराेनानंतर ६०० ते ७०० बसफेऱ्या होत आहेत. मानव विकास मिशनच्या पातूर तालुक्यात काही बसेसचा समावेश आहे.
------------
विद्यार्थी म्हणतात...
गावातील बसच सुरू नसल्याने शाळेत जाताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. पालकांना एखादे महत्त्वाचे काम निघाल्यास शाळेत जाता येत नाही.
- रवी काळे
विद्यार्थी, कानशिवणी
-------
मानाेरा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात; मात्र बसेस सुरू नसल्याने शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
- अजय राऊत
विद्यार्थी, विराहित
---------
काही गावांतील रस्त्यांचे काम सुरू असल्याने बसफेऱ्या बंद आहेत; तर काही गावांमधून प्रवासी संख्याच नसल्याने बसफेरी बंद आहे. हळूहळू सर्व ठिकाणच्या बसेस सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थी असलेल्या बहुतांश गावांतील बसफेऱ्या बंद नाहीत.
- आगारप्रमुख