अकोला : सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या कोरोनाच्या दिव्यांग रुग्णांसाठी व्हील चेअरची सुविधा उपलब्ध केली जाणार असून, त्या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे.कोरोनाची लागण होऊ नये म्हणून वैद्यकीय कर्मचारीदेखील कोरोनाबाधित रुग्णांपासून अंतर राखूनच उपचार करतात. रुग्णालयात दाखल झाल्यापासून, तर त्याला सुटी होईपर्यंत त्याचापासून अंतर राखण्यात येते; मात्र दिव्यांग रुग्णाच्या बाबतीत तसे करणे शक्य नाही. असे असले तरी गुरुवारी एका ५५ वर्षीय दिव्यांग रुग्णाला वॉर्डात नेण्यासाठी कोणी पुढाकार न घेतल्याने त्याला दोन तास रुग्णवाहिकेतच राहावे लागल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार उघडकीस आणला होता. या वृत्तानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाºयांना दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सूचना दिली. त्यानुसार रुग्णाला रुग्णवाहिकेतून काढण्यापासून तर वॉर्डात नेईपर्यंत व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे. शिवाय स्ट्रेचरचीही व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. या संदर्भात बोलताना जीएमसीच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले की, असा प्रकार नेहमीच घडत नाही. कमी मनुष्यबळामध्ये सर्वोपचार रुग्णालयात आवश्यक सर्व सुविधा दिल्या जात आहेत. दिव्यांग रुग्ण दाखल झाल्यास त्याच्यासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे.
कोरोना वॉर्डात दिव्यांगांसाठी विशेष सुविधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 10:35 IST