अकोला: जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी १ कोटी १८ लाख १८ हजार रुपयांच्या कामाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १८ जानेवारी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविला.
बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ११ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. १९९८-९९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधीकरणमार्फत ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली असून, जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली. तेव्हापासून या पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे. योजनेची जलवाहिनी पीव्हीसी पाईपची असल्याने वारंवार लिकेज होते. जलवाहिनी वारंवार लिकेज आणि तूटफूट होत असल्याने योजनेंतर्गत गावांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे यावर्षीच्या जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात कारंजा रमजानपूर पाणीपुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीची उपाययोजना समाविष्ट करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने कारंजा रमजानपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी १ कोटी १८ लाख १८ हजार रुपयांच्या कामाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला आहे.
प्रस्तावात अशा आहेत उपाययोजना!
कारंजा रमजानपूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्ती कामामध्ये योजनेंतर्गत आडसूळ झोनमधील पीव्हीसी जलवाहिनी बदलून त्याऐवजी डीआयके सात जलवाहिनी टाकणे, योजनेंतर्गत सर्व जलकुंभांची दुरुस्ती करणे, प्रत्येक जलकुंभाला मीटर बसवून पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनांची कामे प्रस्तावात समाविष्ट आहेत.