पारस: न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द करण्यात आले होते. पंचायत समिती सदस्यपद रद्द झाल्यामुळे बाळापूर तालुक्यातील चार गणांची आरक्षण सोडत २३ मार्च रोजी पंचायत समिती बाळापूर येथे काढण्यात आली. यामध्ये पारस पंचायत समिती भाग १ मधील आरक्षण सर्वसाधारण पुरुष वर्गाकरिता निघाल्याने पारस येथील सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी कार्यकर्ते दावेदारी करीत आहेत. यासोबतच अपक्ष उमेदवारांचीसुद्धा गर्दी होणार आहे.
निवडणूक लवकरच होत असल्यामुळे काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांचा उमेदवारी दावेदारी करून प्रचारही सुरू केला आहे. नुकत्याच एक वर्ष आधी झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीमधून वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल हमीद अब्दुल वाहेद विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे बाबुराव इंगळे यांचा पराभव केला होता. मागील निवडणूक पाहता, पारस पंचायत समिती गणातून वंचित बहुजन आघाडी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. परंतु आता पुढे होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र वेगळेच राहणार आहे. गतवेळच्या उमेदवारांना पक्षाने उमेदवारी दिली तर बंडाळी होण्याची शक्यता आहे. पक्षाने उमेदवारीत बदल केला तर पारस पंचायत समिती निवडणुकीचे चित्र वेगळेच राहणार आहे. यामागील ग्रामपंचायतीची निवडणूक कारणीभूत ठरणार आहे. सध्या पारस पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली. यामध्ये वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एआयएमआयएम या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचाही बोलबाला वाढणार आहे. असे असले तरी, पक्षाचे तिकीट कोणाला मिळणार, कोण बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.