अकोला - कुंभारी येथील सुमारे १५0 वर्षांंपूर्वीच्या शिवमंदिरातील शिवमूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना बुधवारी पहाटे उजेडात आली. या घटनेने गावात तणावाचे होते, मात्र पोलीस बंदोबस्त लावण्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, मद्यप्राशन केलेल्यांचा हा धुडगूस असल्याची प्राथमिक माहिती आहे.कुंभारी येथे श्री नागनाथ महाराज मंदिरातील शिवमूर्तीवर अज्ञात समाजकंटकांनी मंगळवारी मध्यरात्री दगडाचे घाव घालून मूर्तीचा चेहरा विद्रूप केला. यासोबतच मूर्तीसमोर असलेले शिवलिंग आणि नंदीची तोडफोड केली. त्यामुळे कुंभारी येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सिव्हिल लाइन पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जमावाला शांत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी शिवमूर्तीची विटंबना करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. मूर्तीची विटंबना करणार्यांवर तातडीने कारवाई न केल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशारा पांडे गुरुजी यांनी दिला. या मंदिरात आता शिवमूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे पांडे गुरुजी यांनी सांगितले. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कुंभारी येथे शिवमूर्तीची विटंबना
By admin | Updated: April 9, 2015 01:35 IST