अकोला: दिल्ली येथे सुरू असलेल्या ६0 व्या राष्ट्रीय शालेय मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या ३ बॉक्सरांनी अकोला बॉक्सिंगच्या नावाला साजेशी खेळी करीत उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करीत आहे.महाराष्ट्र शालेय संघामध्ये ११ पैकी ३ खेळाडू शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे आहेत. यामध्ये ५४ किलो वजनगटात अभय सोनोने, ५७ किलो वजनगटात राष्ट्रीय पदक विजेता हरिवंश टावरी आणि ८१ किलो वजनगटात करण कळमकर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिघांनीही सुवर्णपदक पटकाविले होते. तसेच या स्पर्धेत महाविद्यालयाचा सुदर्शन येणकर याने कांस्यपदक मिळविले होते. महाविद्यालयाच्यावतीने चौघांचाही सत्कार करण्यात आला होता. राष्ट्रीय स्पर्धेत खेळ प्रदर्शन करीत असलेल्या तिन्ही खेळाडूंना राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट आणि प्रशिक्षक पुरुषोत्तम बावणे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अँड. अरूण शेळके, उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी खेळाडूंचे कौतुक करून, पदकाची आशा व्यक्त केली. गुरुवार, ८ जानेवारी रोजी स्पर्धेतील अंतिम फेरी होणार आहे.