लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या शाळांमध्ये यंदाच्या शालेय सत्रापासून कॉन्व्हेंट सुरू होणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. विद्यार्थ्यांमध्ये मनपाच्या शाळांप्रती आवड निर्माण व्हावी, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशातून उर्दू शाळा क्रमांक ६ चे मुख्याध्यापक अ.अजीज यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांसाठी स्कूल व्हॅनची खरेदी केली आहे. मनपा शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्कूल व्हॅनची खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराचा परिणाम प्रामुख्याने मराठी, हिंदी माध्यमाच्या शाळांवर झाल्याचे दिसून येते. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक कोणत्याही सुधारणांसाठी प्रयत्न केले नाहीत. परिणामी, मराठी आणि हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरल्यामुळे मागील दहा वर्षांमध्ये दोन वेळा मनपा शाळांचे समायोजन करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हातामध्ये घेतल्यानंतर अजय लहाने यांनी शिक्षण विभागाला ताळ््यावर आणण्याचा निर्णय घेतला. उपायुक्त समाधान सोळंके यांच्या मदतीने शिक्षण विभागाच्या कामकाजावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे आज रोजी दिसून येत आहे. मनपाच्या शाळांमध्ये नर्सरी, केजी १, केजी २ उपलब्ध नसल्यामुळे आजपर्यंत गोरगरीब घरातील मुलांची कुचंबणा होत होती. नाइलाजाने त्यांच्या पालकांना पोटाला चिमटा देऊन खासगी कॉन्व्हेंटमध्ये धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र होते. महापालिकेच्या शाळा टिकवून ठेवण्यासोबतच गोरगरीब घरातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी यंदाच्या शालेय सत्रापासून मनपा शाळांमध्ये नर्सरी, केजी १, केजी २ चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाचे सकारात्मक धोरण पाहता शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय, उर्दू शाळा क्रमांक ६ चे मुख्याध्यापक अ.अजीज यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल व्हॅनची खरेदी केली आहे. निवडणूक कामाचे दहा हजार दिले शाळेसाठी!मनपाच्या सिंधी-हिंदी शाळा क्रमांक १ मधील शिक्षक गजानन काकड यांना मनपाच्या निवडणूक कामाचे दहा हजार रुपये मानधन प्राप्त झाले. या मानधनाची तरतूद काकड यांनी शाळेच्या विकासासाठी क रीत उपायुक्त समाधान सोळंके यांच्या स्वाधीन केले.
मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्कूल व्हॅन’ची खरेदी!
By admin | Updated: June 16, 2017 00:32 IST