एसटी महामंडळाच्या आंतर विभागातून प्रशांत काळमेघ (कारागीर-औरंगाबादहून अकाेला), कपिल सुभाष अकमार (सहायक- जळगाव), नंदू भवान कांबळे (चालक- अहेरी), दुर्गादास आत्माराम राऊत (वाहक-जाफराबाद), गाेपाल सुखदेव बोंदे (वाहक-सिल्लाेड), गोकुलदास राजुसिंग आढाव (वाहक-सिल्लोड), उल्हास महादेवराव खराटे (चालक-आर्वी), विवेक नारायण इंगळे (चालक-मुंबई) यांची अकोला विभागात बदली झाली. संबंधित ठिकाणाहून त्यांना कार्यमुक्तही करण्यात आले. हे सर्व कर्मचारी अकोला विभागात रुजू होण्यासाठी आले असता त्यांना रुजू करून घेतले नाही. या कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाला साेमवारी निवेदन सादर केले. गत सहा महिन्यांपासून विभागीय कार्यालय रुजू करून घेण्यास टाळत असल्याचा आराेप निवेदनात केला. वेतन, भत्ते बंद असल्याने घरखर्चही भागविणे या कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे. यातील काही कर्मचारी आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत.
विविध विभागामधून बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याबाबत मध्यवर्तीय कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे. याबाबत येत्या काही दिवसांमध्ये सहायक आयुक्तांची भेट घेणार आहे.
- पराग शंभरकर, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी
बिंदुनामावली अद्ययावत नसल्याने अडचण
गेल्या काही वर्षांपासून विभागाची बिंदुनामावली अद्ययावत नाही. याकरिता सहायक आयुक्तांनी बिंदुनामावली अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहे; परंतु या प्रक्रियेतील आरक्षणाच्या बाबतीत अजूनही निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे बिंदुनामावली अद्ययावत करता येत नसल्याचे पत्रही विभागाला प्राप्त झाले आहे.