लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : शासकीय तूर खरेदी अंतर्गत नाफेडला तूर विकून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना तेल्हारा न्यायालयाने २९ जून रोजी जामीन मंजूर केला, तर यातील एक आरोपी अद्यापही पसार असून, या प्रकरणात आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता वाढली आहे.शासनाने नाफेडच्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरू केले. हिवरखेडचे व्यापारी प्रदीप चिरंजीलाल बजाज व सुनील चिरंजीलाल बजाज या दोघा भावांनी व्यापारी असताना शासकीय केंद्रावर तेल्हारा व अकोट येथे एकाच सात-बारावर मोठ्या प्रमाणात तूर मोजली. नाफेड केंद्रावरील तूर प्रकरणाची चौकशी सुरू असताना तेल्हारा येथील सहायक निबंधक राजुसिंग राठोड यांनी सदर व्यापाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी तूर विक्री करण्याचा अधिकार नसताना नाफेडला तूर मोजून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार २७ जून रोजी दिली. प्रदीप बजाज, सुनील बजाज, गोपाल चांडक यांनी आपल्या पत्नीच्या नावाने तूर विकल्याचे राठोड यांनी फिर्यादीत म्हटले होते. या फिर्यादीवरून प्रदीप बजाज व सुनील बजाज या दोघांना तेल्हारा पोलिसांनी २८ जून रोजी अटक केली होती. त्यांना २९ जून रोजी तेल्हारा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणातील तिसरा आरोपी गोपाल शिववल्लभदास चांडक रा. हिवरखेड हा पसार आहे. त्याने आपल्या पत्नीच्या नावे अकोट येथे ५५ क्विंटल तूर दोन ठिकाणी मोजून शासनाची फसवणूक केल्याचे चौकशी अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहायक निबंधक कार्यालयाने सखोल चौकशी करण्याची गरज आहे. अनेकांनी मोठ्या प्रमाणात नाफेडला तूर दिली आहे. पसार आरोपींचा शोध तेल्हाराचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनत पीएसआय गणपत गवळी, नागोराव भांगे करीत आहेत.
तूर विक्री; आरोपी वाढण्याची शक्यता
By admin | Updated: June 30, 2017 01:13 IST