शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रोजंदारीवर काम करणारे तसेच त्रयस्थ संस्थेमार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही महिन्यांपासून थकीत असल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर थकीत वेतनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. कोरोना महामारीच्या काळात जोखीम पत्करून काम करूनही वेतन थकीत राहत असल्याने कर्मचारी संताप व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता गेल्या सुमारे महिनाभरापासून सुटीवर आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून हीच स्थिती कायम असल्याने कर्मचाऱ्यांना नेहमीच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वेतनासाठी निधीची उपलब्धता असूनही अधिष्ठातांच्या स्वाक्षरीअभावी वेतन रखडले आहे. प्रशासनाने थकीत वेतनाच्या आड येणाऱ्या अडचणी सोडवून रोजंदारी व त्रयस्थ संस्थेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी काढण्याची मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
प्रभारींकडे नाही आर्थिक व्यवहारांचा कार्यभार
जीएमसीच्या अधिष्ठाता महिनाभरापेक्षा जास्त काळापासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यांचा प्रभार डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. घोरपडे यांनी यापूर्वीदेखील अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळला आहे, मात्र सध्या त्यांच्याकडे आर्थिक व्यवहारांचे अधिकार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनादेखील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न निकाली काढणे शक्य नसल्याचेही येथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.