अकोला : संचारबंदी असल्यामुळे एस. टी. महामंडळाच्या सर्वच कार्यालयांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही कमीत कमी १५ टक्के असावी व ५० टक्केच्यावर नसावी, अशा सूचना आहेत. आधीच महामंडळात जागांचा अनुषेश कायम असून, आता कमी मनुष्यबळावर जिल्ह्यातील एस. टी. महामंडळाच्या कार्यालयाचा गाडा चालत आहे. मागील वर्षभरापासून एस. टी. महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व घटती प्रवासी संख्या याला कारणीभूत ठरत आहे. कडक संचारबंदीमुळे महिन्याभरापासून एस. टी. बसेसची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात केवळ १० ते ११ बसेस सुरू आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशास्थितीत कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एस. टी. महामंडळानेही राज्यातील सर्वच कार्यालयांत कमीत कमी १५ टक्के व इतर कुठल्याही कारणास्तव कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आधीच जागांचा अनुषेश, त्यात उपस्थिती कमी असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे.
--बॉक्स--
जिल्ह्यातील एकूण आगार
०५
चालक
४४८
वाहक
४३८
अधिकारी
०३
यांत्रिकी कर्मचारी
४५७
प्रशासकीय अधिकारी
३१
--बॉक्स--
चालक-वाहकासह सर्व कर्मचाऱ्यांना सूचना
जिल्ह्यात एस. टी. बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालक-वाहकांची संख्याही कमी झाली आहे. विभागीय कार्यालय व विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू करण्यात आला आहे. ५० टक्क्यांच्या आत कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे.
--कोट--
एस. टी. फेऱ्यांची संख्या कमी आहे. त्यानुसार चालकांची संख्याही कमी करण्यात आली आहे. १५ टक्के उपस्थितीनुसार ड्युटी लावण्यात येते. चालकांकडून सूचनांचे पालन करण्यात येत आहे.
- सतीश दौड, चालक
--कोट--
कार्यालयात कमीत कमी १५ टक्के व इतर कुठल्याही कारणास्तव कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार कार्यालयीन कर्मचारी उपस्थित आहेत.
- चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक