अकोला, दि. ३0- महापालिका क्षेत्रात सामील झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामे निकाली काढण्यासाठी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१0 कोटींचा विकास आराखडा तयार केला. आराखड्यावर महापालिका आयुक्त अजय लहाने यांची गुरुवारी सायंकाळी स्वाक्षरी झाली असून, यामध्ये जमा केला जाणारा मनपाचा हिस्सा वगळण्याची विनंती शासनाकडे करण्यात आल्याची माहिती आहे. शुक्रवारी नगर विकास विभागाकडे विकास आराखडा सादर केला जाईल. सप्टेंबर २00१ मध्ये महापालिका अस्तित्वात आली. शहराची लोकसंख्या व मनपा क्षेत्राचे भौगोलिक क्षेत्रफळ ध्यानात घेता, महापालिकेने शासनाकडे हद्दवाढीसाठी प्रस्ताव सादर केले. यामध्ये शहरालगतच्या २४ गावांचा समावेश करण्याची मागणी होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर ३0 ऑगस्ट २0१६ रोजी शासनाने मनपा क्षेत्राच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी करीत १३ प्रमुख ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपामध्ये समावेश केला. नवीन प्रभागात विकास कामे तर सोडाच, साध्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी विकास कामांसाठी २५४ कोटींचा आराखडा मनपाकडे सादर केला होता. नवीन प्रभागांमध्ये विकास कामांची निकड लक्षात घेता, मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने टिप्पणी तयार करून ४ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत सादर केली होती. आराखड्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली होती. प्रशासनाने नवीन प्रभागात उपलब्ध होतील, अशा मूलभूत सोयी-सुविधा ध्यानात घेतल्या असता, विकास आराखड्याच्या कि मतीत वाढ झाली. सरतेशेवटी ३१0 कोटींचा सर्वंंकष आराखडा तयार झाला. यावर आयुक्त अजय लहाने यांची स्वाक्षरी झाली असून, शुक्रवारपर्यंत नगर विकास विभागाकडे सादर केला जाणार आहे.
नव्या प्रभागांसाठी ३१0 कोटींचा आराखडा
By admin | Updated: March 31, 2017 01:53 IST