खानापूर : पातूर विद्युत उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या कोठारी बु. येथील विद्युत रोहित्र गत दीड महिन्यांपासून बंद असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी सिंचन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पिके कोमेजली आहेत. कोठारी येथील विद्युत रोहित्र बंद झाल्यानंतर स्थानिकांनी १२ जुलै रोजी ते दुरुस्त करण्याची मागणी विद्युत कंपनीच्या पातूर येथील कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे केली होती; परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्यांनी विहिरींचे पाणी देणे सुरू केले आहे; परंतु रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे शेतकर्यांना सिंचन करणे दुरापास्त झाले आहे. पाण्याअभावी पिके सोकू लागली असून, लवकरच पाणी मिळाले नाही, तर पेरण्या उलटण्याची दाट शक्यता आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन विद्युत रोहित्र दुरुस्त करावे किंवा नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी पूर्णाजी इंगळे, हरिदास करवते, रमेश वरणकार, देवराव इंगळे, ज्ञानदेव इंगळे, भानुदास घुगे, रवींद्र करवा, शंकर घुगे यांच्यासह इतर शेतकर्यांनी केली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या शेतकर्यांनी दिला आहे.
कोठारी येथील रोहित्र दीड महिन्यांपासून बंद
By admin | Updated: August 19, 2014 01:22 IST