अकोला : हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलातून सुमारे ३५ गुरांना कत्तलीसाठी हकलत नेत असताना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने गुरुवारी सायंकाळी त्यांना जीवदान दिले. या गुरांना गोरक्षण संस्थेत ठेवण्यात आले आहे. विशेष पथकाने तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या जंगलातून शेख राजीक शेख अकील, वय ४५ वर्ष, राहणार हिवरखेड हा सुमारे ३५ गुरांना कत्तलीसाठी जंगलातून नेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी गुरुवारी जंगलात सापळा रचून शेख राजीक शेख अकील यास ताब्यात घेतले. त्यानंतर कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ३५ गुरांना जीवदान दिले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ३५ गुरांना जीवदान देऊन गोरक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असताना जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई करून त्यांचे प्राण वाचविले. या जंगलातून यापूर्वी ३० गुरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचे प्राण वाचविले होते. यावरून हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुरांची कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.