हिवरखेड/तेल्हारा(जि. अकोला) : विद्युत जोडणी न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या विनोद खारोडेचे वडील रामदास खारोडे यांनी बुधवारी हिवरखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत महावितरणच्या अभियंत्यांच्या लाचखोरीचा पाढाच वाचला. विद्युत जोडणीसाठी हिवरखेड आणि तेल्हारा येथील अभियंत्यांनी पैशाची मागणी केली होती, असा आरोप खारोडे यांनी केला आहे. पैसे दिल्याशिवाय विद्युत जोडणी तातडीने मिळणार नाही, असेही या अभियंत्यांनी म्हटल्याचे खारोडे यांनी तक्रारी नमूद केले आहे. रामदास खारोडे याचे तळेगाव खुर्द येथील शेत गट नं. ४९४ मध्ये शेत आहे. ते वयोवृद्ध असल्याने त्यांचे शेत मुलगा विनोद पाहतो. त्याने सेंट्रल बँकेचे कर्ज घेऊन बोअरवेल खोदली. विद्युत जोडणीसाठी महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले. शुल्कही भरले. वेळोवेळी शाखा अभियंता व उपकार्यकारी अभियंत्यांची भेटीही घेतल्या. मात्र, अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप रामदास खारोडे यांनी तक्रारीत केला. या प्रकरणी महावितरणच्या हिवरखेड येथील साहाय्यक अभियंता घोडे व तेल्हारा येथील उपकार्यकारी अभियंता राऊत यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी तक्रारीत केली.
*असे छळले यंत्रणेने
२0 हजार दिल्यास १५ दिवसांच्या आत विद्युत जोडणी देतो, असे हिवरखेड येथील साहाय्यक अभियंत्याने विनोदला म्हटले होते, असे रामदास खारोडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने विनोद पैशाची मागणी पूर्ण करू शकला नाही. काही दिवसांनी विनोदने विद्युत जोडणीसाठी तेल्हारा येथील उपकार्यकारी अधिकारी राऊत यांच्याशी संपर्क साधला. विद्युत जोडणी लवकर हवी असेल तर पैसे खर्च करावे लागतील, असे राऊत म्हणाल्याचे खारोडे यांनी तक्रारीत नमूद केले. पैसे दिल्याशिवाय महावितरणचे अभियंते विद्युत जोडणी देणार नाहीत, हे विनोदच्या लक्षात आले होते. तुमच्या जवळ २0 हजार रुपये नसतील तर तुम्हाला नियमाप्रमाणे २-३ वर्षानंतर विद्युत जोडणी मिळले, असे अभियंत्यांनी विनोदला म्हटल्याचे रामदास खारोडे यांनी तक्रारीत नमूद केले. तेल्हारा येथील उपकार्यकारी अभियंत्यांनी मुलगा विनोदला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप वडील रामदास खारोडे यांनी केला आहे.
*महावितरणचे साहाय्यक अभियंता घोडे निलंबित
महावितरणच्या हिवरखेड शाखा कार्यालयांतर्गत तळेगाव बाजार येथील शेतकरी विनोद रामदास खारोडे यांनी मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये केलेल्या प्राथमिक चौकशीच्या अहवालानुसार हिवरखेड शाखेचे साहाय्यक अभियंता संदीप घोडे यांना निलंबित करण्यात आले असून, तेल्हारा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र राऊत यांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तसेच या घटनेची आणखी चौकशी करण्यात येत आहे.